विधानसभेत महाविकास आघाडी 180 जागा जिंकणार; खासदार संजय राऊत यांचा विश्वास

‘महाविकास आघाडीचा चेहरा कोण? याविषयी आमच्यामध्ये मतभेद नाहीत. तिघांनी एकत्र निवडणूक लढल्यावर लोकसभेत काय निकाल लागला ते सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात एकत्र निवडणुका लढणार आहोत. विधानसभेत महाविकास आघाडी कमीत कमी 175 ते 180 जागा जिंकेल,’ असा विश्वास शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. ‘आमची आघाडी हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा,’ या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, ‘पवार यांचे म्हणणे योग्य आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरविला असता तर ‘इंडिया’ आघाडीच्या देशात किमान 25 ते 30 जागा वाढल्या असत्या. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही. कोणतेही सरकार पिंवा संस्था बिनचेहऱयाची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतोय हे लोकांना कळायला हवे. आम्ही या विषयावर बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ,’ असेही त्यांनी सांगितले.

फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही
देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राज्यातील जनतेने त्यांचा पक्ष आणि त्यांचे नेतृत्व झिडकारले आहे. फडणवीस हे स्वतःला नाना फडणवीसांचा मोठा भाऊ समजत होते; पण तसे काही नाही. नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. फडणवीसांना त्यात स्थान नाही,’ असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी लगावला.