विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मारणार बाजी, ताज्या सर्व्हेतून जनमताचा कल समोर!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी लाडकी बहीण सारख्या योजना आणून जनतेला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी राज्याच्या जनतेचा कौल हा महाविकास आघाडीला असणार हे आणखी एका सर्व्हेतून समोर आले आहे.

नामांकित सर्व्हे एजन्सी ‘लोक पोल’ने एक सर्व्हे जाहीर केला आहे. या सर्व्हेनुसार महायुतीला येत्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडी निवडणुकीत बहुमताचा आकडा सहज पार करेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे.

या सर्वेक्षणात महाविकास आघाडी 141-154 जागा जिंकेल आणि महायुतीला 115-128 जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे. यापूर्वी ‘लोक पोल’ या संस्थेने कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व्हे केले होते. या सर्व्हेतील मांडलेले अंदाज निवडणुकांच्या निकालानंतर खरे ठरले होते.

महाराष्ट्रातील सर्वेक्षणात सर्व 288 मतदारसंघांमधील दीड लाख मतांचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांमधून जनतेच्या मनातला सध्याचा कल समोर आला आहे. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीतील जबरदस्त कामगिरीची पुनरावृत्ती करेल, असे नमुन्यांच्या अभ्यासातून समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महायुती पेक्षा 3-6 टक्के जास्त मते मिळतील असाही अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.