स्थानिक आमदाराला, आयुक्ताला भीक द्या!

भीक द्या, भीक द्या, आमदाराला भीक द्या, आयुक्ताला भीक द्या,’ अशी घोषणाबाजी करत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड आणि विविध संघटनांनी ‘भीक मांगो’ आंदोलन केले.

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ‘भीक मांगो’ आंदोलन

महापालिकेच्या वतीने मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 100 फुटी पुतळ्यातील महाराजांच्या मोजडीला तडा गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. याच्याच निषेधार्थ महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक संघटनांनी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. आंदोलनकर्ते महापालिका गेटवर येऊन धडकले. या आंदोलनात तीन हजार 170 रुपये जमा झाले. हे पैसे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना देण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मात्र, पोलिसांनी त्यांना
महापालिका भवनात प्रवेशापासून मज्जाव केला.

या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले, महिला संघटिका सुलभा उबाळे, शहर समन्वयक योगेश बाबर, महिला आघाडीच्या अनिता तुतारे, वैभवी घोडके, शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेविका विनया तापकीर, संभाजी बिग्रेडचे सतीश काळे, मानव कांबळे, मारुती भापकर, विनायक रणसुभे, प्रकाश जाधव, अमोल निकम आदी सहभागी झाले होते.

तज्ञांची समिती स्थापन करा

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी तज्ञांची समिती स्थापन करावी, दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.