आधी केली गद्दारी… नंतर मतांची चोरी! पुण्यातील विधानभवनावर महाविकास आघाडीचे आंदोलन

ईव्हीएमच्या आशीर्वादाने स्थापन होत असलेल्या सरकारचा मुंबईत आझाद मैदानावर शपथविधी सुरू असताना पुण्यात जुन्या विधानभवनावर महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. मतांची चोरी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… आधी केली गद्दारी, नंतर केली मतांची चोरी… ईव्हीएम सरकार हाय हाय… आधी केली ईव्हीएमची चोरी आता केली, मतांची चोरी अशा घोषणा देत महाविकास आघाडीने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा पुकारला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह काँग्रेस नेते मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, न्या. बी. जी. कोळसे पाटील, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, विश्वंभर चौधरी, अजित अभ्यंकर, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, तसेच अश्विनी कदम, दत्ता बहिरट यांच्यासह अनेक मान्यवर व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या, भारतीय संविधानाला सर्वोच्च मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लोकशाहीचे हे अधःपतन सहन होणार नाही असे म्हणत सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू असताना अंधारे यांनी दिलेल्या घोषणांना उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद देऊन महायुती सरकारचा धिक्कार केला.

राज्यात चोर सरकार

पुणे जिह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवरील मतांची पडताळणी करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ईव्हीएम आणि मतांची चोरी करून हे सरकार सत्तेवर आले आहे असे सांगून आंदोलकांनी राज्यातील हे महायुतीचे सरकारदेखील चोर असल्याचे सांगितले. त्यावर उपस्थितांनी स्वयंस्फूर्तीने चोर सरकारचादेखील धिक्कार केला.