रत्नागिरीत ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

ईव्हीएम हटाव… देश बचाव असा नारा देत आज महाविकास आघाडीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि भाजपने मिळवलेल्या विजयानंतर ईव्हीएमबाबत शंका निर्माण झाली. ईव्हीएम घोटाळा करुन भाजप पुन्हा सत्तेवर आला असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ईव्हीएमच्या विरोधात पडसाद उमटत आहेत. रत्नागिरीमध्येही महाविकास आघाडीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले. ईव्हीएम हटाव… देश बचाव असा नारा यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, सामाजिक कार्यकर्ते युयूत्सू आर्ते, काँग्रेसचे अशोक जाधव, आदी उपस्थित होते.