
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने तुम्हाला अस्मान दाखविले, याचे भान गुजरातच्या नेत्यांनी ठेवावे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारच, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असा जबरदस्त विश्वास शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेना उपनेते, काष्टी गावचे सरपंच, श्रीगोंदा बाजार समिती संचालक साजन पाचपुते यांच्या श्रीगोंदा शहरातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले होते.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 10 जागाही मिळणार नाहीत, असे नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस बोलत होते. मात्र, कोटय़वधी रुपये खर्च करूनही भाजपला महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने अवघ्या 9 जागांवर रोखले. मुंबईतील आमची एक जागा तर त्यांनी 40 मतांनी चोरली, असा टोला लगावत खासदार संजय राऊत म्हणाले, राजकारणात खरेपणा असावा, महाराष्ट्राला खोटे बोलण्याची परंपरा नाही. छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांचा हा महाराष्ट्र आहे. तो लाचार नाही, कोणापुढे झुकणार नाही, हे लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी जनतेने दाखवून दिले. याचे भान दिल्लीतील गुजरातच्या नेत्यांनी ठेवावे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार, याबाबत शंका घेण्याचे काहीच कारण नाही. असे संजय राऊत म्हणाले.
यावेळी संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, पुण्याचे वसंत मोरे, बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार, तालुकाप्रमुख विजय शेंडे, खासदार लंके याच्या पत्नी राणी लंके, भगवान फुलसौंदर, नगर शहरप्रमुख संभाजी कदम, नगर तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, शरद झोडगे, भाऊसाहेब गोरे, श्रीगोंदा शहरप्रमुख संतोष खेतमाळीस आदी उपस्थित होते.