विधान परिषदेचे सभापतीपद तातडीने भरा, महाविकास आघाडीची राज्यपालांकडे मागणी

विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेचे सभापती पद गेली 2 वर्षे 6 महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे विधान परिषद विनानेतृत्व सुरू असल्याची महाविकास आघाडीच्या आमदारांची भावना झाली आहे. तरी राज्यपालांनी याची दखल घेऊन सभापती पदासाठी तातडीने निवडणूक घेऊन ते भरावे, अशी मागणी महाविकास आघाडीने आज राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली.

महाविकास आघाडीच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने राज भवन येथे आज राज्यपाल बैस यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. सभापती पदाची निवडणूक व्हावी, अशी भूमिका महाविकास आघाडीने वारंवार मांडली आहे. सभापती पद रिक्त राहणे हे घटनेच्या विरोधात आहे. सभापती पदासाठी निवडणूक घेण्याचे निर्देश देणे हा राज्यपालांचा अधिकार आहे. मात्र राज्य सरकारने राज्यपालांना सभापती पद रिक्त असल्याची माहितीच दिलेली नाही, असे नमूद करतानाच, राज्यपालांनी तशा सूचना सरकारला द्याव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. राज्यपालांनी त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दानवे यांनी या भेटीनंतर सांगितले.

शिष्टमंडळात अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, विधानसभेतील शिवसेना गटनेते अजय चौधरी, शिवसेना नेते-आमदार भास्कर जाधव व अनिल परब, उपनेते-आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, रमेश कोरगावकर, ज.मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेस आमदार सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा समावेश होता.