महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार

गणेशोत्सवापूर्वी भगवा सप्ताहामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. त्या माध्यमातून शिवसैनिकांनी पक्षाचे मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवले. रत्नागिरी जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांनी विभागवार बैठका घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता आणणार आहोत. पुन्हा एकदा भगवा फडकवणार आहोत असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

पक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गावागावात शिबिरे होत असल्याचीं माहिती त्यांनी दिली. मोफत डोळ्यांची तपासणी आणि चष्मावाटप शिबिरांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत साडेसहा हजार ग्रामस्थांनी त्या शिबिरांचा लाभ घेतला. ही शिबिरे यापुढेही सुरु राहणार आहेत अशी माहिती राजेंद्र महाडीक यांनी दिली. चिपळूण-संगमेश्वर, रत्नागिरी-संगमेश्वर आणि लांजा-राजापूर या तीनही मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत आहे. गावागावामध्ये गटप्रमुख, बूथ प्रमुख सक्रीय आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही भगवा फडकवण्यासाठी सज्ज झालो आहोत असे राजेंद्र महाडीक यांनी सांगितले. लांजा-राजापूर मतदार संघात आमदार राजन साळवी हे तळागाळात पोहोचले आहेत. त्यांनी मतदारसंघात केलेले काम कुठल्या पक्षप्रवेशामुळे पुसले जाणार नाही, असे राजेंद्र महाडीक यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

पक्षप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आम्हाला शिरसावंद्य आहे. आमच्या पक्षात जर कोण येणार असेल आणि पक्ष वाढणार असेल तर त्याचे आम्ही स्वागत करु असे राजेंद्र महाडीक यांनी सांगितले. पक्षप्रमुख देतील तो उमेदवार आम्ही मोठ्या ताकदीने निवडून आणू. त्यासाठी आमची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, माजी जि.प.उपाध्यक्ष उदय बने, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत उपस्थित होते.