महाविकास आघाडीचे जागावाटप ‘ओक्के’, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी थोरात यांची यशस्वी चर्चा

महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आज प्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आणि नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. काही जागांवरून निर्माण झालेली गुंतागुंत या चर्चेद्वारे सोडवली गेली असून जागावाटप ओक्के असल्याचे या चर्चेनंतर थोरात यांनी सांगितले.

विदर्भातील काही जागांवरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये मतभेद होते. ते चर्चेतून सोडवले जावेत यासाठी आज आघाडीच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाली. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यात समन्वयक म्हणून भूमिका बजावली. थोरात यांनी आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ते मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले.

मातोश्रीवरील चर्चेनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. काही जागांबाबत थोडे विषय बाकी आहेत, फार अडचण नाही. प्रत्येकाला वाटते आपला उमेदवार तिथे निवडून येईल. मात्र हा वादाचा विषय नाही. दिल्लीतही पक्षश्रेष्ठाRबरोबर त्याबाबत चर्चा झाली आहे, असे थोरात म्हणाले.

n शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरात मातोश्री निवासस्थानी पोहचले. साधारण अडीच तास ते मातोश्री निवासस्थानी होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि थोरात यांच्यात जागावाटपासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. चर्चेतून आम्ही सगळ्या गोष्टी मार्गी लावणार आहोत. उद्धव ठाकरे यांना काय वाटतं, पवारांच्या मनात काय आहे हे मी समजून घेतले, असे थोरात यांनी बैठकीनंतर नमूद केले.

आज सायंकाळी ग्रॅंड हयात हॉटेलमध्येही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात संबंधित जागांबाबत सकारात्मक चर्चा झाली असे सांगण्यात आले.