ईव्हीएममध्ये छेडछाड, याद्यांचा घोळ, पैसे वाटप… निवडणूक घोटाळा हायकोर्टाच्या रडारवर

विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देणारा ‘निवडणूक घोटाळा’ उच्च न्यायालयाच्या रडारवर आला आहे. निवडणुकीत मतदारांना भुलवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पैशांचे वाटप, ईव्हीएममध्ये छेडछाड तसेच मतदार याद्यांमध्ये घोळ घालण्यात आला. हे गैरप्रकार रोखण्याकामी निवडणूक आयोगही ढिम्म राहिला, असे गंभीर दावे करीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांनी मंगळवारी मुंबईत 12 तर छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात 35 अशा एकूण 47 याचिका दाखल केल्या. या याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, पालघर येथील महाविकास आघाडीच्या प्रशांत जगताप, महेश कोठे, अजित गव्हाने, नरेश मणेरा, सुनील भुसारा, मनोहर मढवी, राहुल कलाटे, वसंत गीते, संदीप नाईक, रमेश बागवे व पृथ्वीराज चव्हाण या उमेदवारांनी हायकोर्टात अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रीया आवले व अॅड. अजिंक्य गायकवाड यांच्यामार्फत याचिका दाखल केली. निकाल रद्द करावा. तसेच विजयी उमेदवाराची निवड अवैध ठरवून दुसऱया क्रमांकावरील उमेदवारांना विजयी घोषित करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.

निवडणूक आयोगाला कारणे दाखवा नोटीस बजावा

व्हीव्हीपॅट मशीनमध्ये करण्यात आलेल्या छेडछाडप्रकरणी निवडणूक आयोगाने कोणतीही खबरदारी न घेतल्याने आयोगाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

फेरनिवडणुका घेण्याची उमेदवारांची मागणी

निवडणुकीत जे उमेदवार घोटाळा करून निवडून आले आहेत त्यांची निवड अवैध ठरवण्याबरोबरच फेरनिवडणुका घेण्याची मागणी काही उमेदवारांनी न्यायालयाला याचिकेद्वारे केली आहे.

ऑडिट रिपोर्ट सादर करा

निवडणूक निकालात करण्यात आलेल्या हस्तक्षेपप्रकरणी ऑडिट करण्यात यावे व त्याचा अहवाल सादर करण्यात यावा त्याचबरोबर व्हिडीओ व ऑडिओग्राफीचे फुटेज सादर करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात 35 याचिका

उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठामध्ये 35 उमेदवारांनी निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पराभूत उमेदवारांनी जे आक्षेप घेतले होते, तक्रारी केल्या होत्या त्याबाबत निवडणूक आयोगाने कोणतीही दखल घेतली नाही, असे म्हणणे याचिकांमधून मांडत उमेदवारांनी न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. याचिकाकर्त्या उमेदवारांमध्ये पैलास गोरंटय़ाल, सर्जेसर्व मोरे, प्रवीण चौरे, महेबुब शेख, राजेश टोपे, राम शिंदे, राजू शिंदे, पृथ्वीराज साठे, बबलू चौधरी, चंद्रकात दानवे, बाळासाहेब थोरात, सतीश पाटील, राणी लंके, पृथ्वीराज साठे, प्रताप ढाकणे, प्राजक्त तनपुरे, अमित भांगरे, जयप्रकाश दांडेगावकर, राहुल मोटे, संदीप वर्षे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील आदींचा समावेश आहे. निवडणुकीत बोगस मतदानासह अनेक गैरप्रकार झाल्याचा दावा करीत ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

चौकशी, कारवाईचे आदेश द्या

निवडणुकीतील अफरातफरप्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश द्यावेत तसेच संबधितांवर कारवाई करावी याशिवाय न्यायालयाने प्रतिवाद्यांना दंड ठोठवावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकेतील दावे

मतदार याद्यांमधील घोळ, निवडणुकीबाबतची कागदपत्रे व सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगाचा नकार, मते मागण्यासाठी पैशाचा वापर, ईव्हीएम मशीन्सचा गैरवापर यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अपारदर्शकता असून त्याबाबतचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.