
गोरगरीबांना मोफत उपचार मिळावेत यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना’ व ‘पंतप्रधान आयुष्मान भारत योजना’ सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, या योजना आता लवकरच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याचे कारण म्हणजे दोन्ही योजनांचे मिळून सुमारे 270 कोटी रुपयांची बिले राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांना अदा केलेली नाहीत, अशी धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. बिलाचे पैसे थकवल्यामुळे संबंधित रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने या योजनेअंतर्गत रुग्णांना उपचार देणे बंद केले असून याचा परिणाम गोरगरीबांच्या आरोग्य सेवेवर होत आहे.
सध्या अनेक संलग्न रुग्णालयांमध्ये या सोयी सवलतीचा लाभ रुग्णांना मिळत नसल्याचे निदर्शनाला आले आहे. रुग्णालयात चौकशी केली असता गेल्या वर्षभरात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांना कोट्यवधी रुपयांची बिले अदा केलेली नाहीत. त्यामुळे संबंधित रुग्णालयांच्या व्यवस्थापनाने या योजनेअंतर्गत रुग्णांना घेण्याचे हळूहळू बंद केले आहे. या अनुषंगाने शिवसेनेचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी माहितीच्या अधिकारामध्ये महाराष्ट्रामध्ये या योजनेअंतर्गत 31 जानेवारी 2025 पर्यंत किती रुपयांचे एकूण बिल देणे बाकी आहे याची माहिती मागवली असता दोन्ही योजनांत मिळून देय बिलाची रक्कम 270 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. नम्रता शिखरे यांनी दिली.
शिवसेना आज आरोग्यमंत्र्यांना निवेदन देणार
आता रुग्णालयांची 270 कोटी रुपयांची बिले थकवली असून अंडर प्रोसेस बिलांचा आकडा तर 600 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे या दोन्ही आरोग्य योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. रुग्णालयांची बिले थकीत असल्यामुळे याचा आरोग्य सेवेवर परिणाम होऊन जनतेचे अधिकचे पैसे खिशातून जात आहेत. या योजनेच्या फायद्यासाठी उद्या, रविवारी शिवसेनेच्या वतीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.