Mahashivratri 2025 – गोदातीरी असलेली रामायणकालीन शिवालये

>> ज्ञानेश्वर अमृते

गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या तीराबर नेवरगावपासून ते कायगाव टोक्यापर्यंत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करून संकटाचे हरण करणारी संकटेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर, घटेश्वर अशी रामायणकालीन शिवालये आहेत. भव्य हेमाडपंती मंदिरे, अलौकिक नीरव शांतता, गोदावरी नदीचा निसर्गरम्य परिसर, यामुळे महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात या ठिकाणी लाखो भाविक दर्शन घेतात.

रामायण काळात प्रभू श्रीरामचंद्रांनी पंचवटी येथे वास्तव्यास असताना सीतामातेच्या आग्रहास्तव सुवर्णमृगरूपी मायावी मारीच राक्षसाचा पाठलाग केला. श्रीरामांनी वाण मारल्यामुळे सुवर्णमृगरुपी मारीच राक्षसाच्या शरीराचे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले त्यावरून त्या गावचे नामाभिधान प्रचलित झाले. श्रीरामांनी बाण मारल्यावर मारीच हरणाच्या पायाचे खुर या गोदावरी नदीतीरावर पडले. या हरणाच्या खुराला संस्कृतमध्ये नेऊर म्हणतात, म्हणून या गावाला नेऊरगाच हे नामाभिधान पडले. येथे प्रभू श्रीरामांनी आपल्यावर आलेले संकट निवारणासाठी शिवशंकराचे वालुकामय शिवलिंग तयार करून आराधना केली, लेब हे प्रभू श्रीरामांच्या हस्ते स्थापन झालेले संकटेश्वर देवस्थान. पुढे 12 व्या शतकात देवगिरीचे राजे रामचंद्रदेव यादव हे या ठिकाणी शिकारीसाठी आले असताना त्यांच्या नजरेस हे अलौकिक शिवलिंग पडले, त्यांनी या शिवलिंगावर भव्य हेमाडपंती शैलीचे भव्य शिवालय बांधले व याच ठिकाणी त्यांनी श्री संकटेश्वर शिवलिंगाच्या दक्षिणेकडील चाजूला दुसरे शिवालय बांधले. त्या शिवालयाला या राजाच्या नावावरून रामेश्वर असे नाव पडले.

या संकटेश्वर व गावाचा आणि घटनेचा उल्लेख पैठणचे संत शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांनी आपल्या भावार्थ रामायण या ग्रंथांत याप्रमाणे केला आहे.

मृगपाप छेदी श्रीरामरावो
तो छिन्नपाप देह गांवो
नेऊर विंधोनि पडिला पहाहो
तो नेऊरगांवो तेथे की।

असे हे पौराणिक महत्त्व प्राप्त असलेले भव्य दिव्य असे श्री क्षेत्र संकटेश्वर देवस्थान आहे. तसेच संकटेश्वर मंदिरासमोर इथे अजून एक खूपच सुंदर नक्षीकाम असलेले नंदीचे (महादेवाचे वाहन) सुद्धा स्वतंत्र मंदिर आहे. बाकीच्या शिवमंदिरांच्या ठिकाणी आपल्याला नंदीसाठी स्वतंत्र मंदिर कुठेही पहायला मिळत नाही; परंतु श्री संकटेश्वर येथे हे अप्रतिम कलाकुसर केलेले नंदीचे अलौकिक दुर्मिळ असे मंदिर आहे. त्यातील नंदीची भव्य दिव्य अशी पाषाण मूर्ती खूपच सुंदर आहे. खरोखरचा नंदी संकटेश्वर मंदिरासमोर बसला असल्याचा भास होतो. शिवाय प्राचीन असे गणपती मंदिर आहे. गणपती मंदिराच्या उजव्या बाजूला शेजारी दोन संतांची समाधी मंदिरे आहेत. अनंत महाराज व बापट महाराज हे दोन्ही सत्पुरुष खूप मोठे अधिकारी पुरुष होऊन गेले. त्यानंतर पुढे अगदी स्वागतालाच छोटे सुबक असे श्री खंडोबा मंदिर आहे. येथे पुरातन काळातील भग्नावस्थेतील तुटलेला अपूर्ण असा एक शिलालेख पहायला मिळतो.

त्याचबरोबर श्रीरामचंद्रांच्या बाणाने हरणाची काया ज्या ठिकाणी पडली ते कायगाव, डोके उडवले ते टोका. येथे प्रभू श्रीरामांनी मारीच राक्षसाचा वध केला. कायगाव व टोका या ठिकाणी असलेले रामेश्वर, सिद्धेश्वर ही शिवालये देखील रामायणकालीन असल्याची आख्यायिका आहे. पुढे पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य अशी हेमाडपंती मंदिरे बांधून त्याभोवती भक्कम अशी तटबंदी देखील उभी केली. नदींच्या तीरावर भाविकांना स्नान करण्यासाठी मोठमोठे घाट बांधले. पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली ही शिवालये राज्यभर प्रसिद्ध आहेत.

महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. सर्व मंदिरामध्ये पहाटेपासूनच हर हर महादेवच्या जयघोषात रुद्राभिषेक, आरती, कीर्तन, प्रवचनापासून कार्यक्रमांची रेलचेल असते. हजारो शिवभक्त गोदावरी नदीमध्ये स्नान करून महादेवाचे मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतात. माहाशिवरात्रीला सिद्धेश्वर, रामेश्वर, संकटेश्वर महादेव मंदिरात साठ दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू असतात. कथा कीर्तनांनी गोदाकाठ दुमदुमून गेला आहे. त्याच बरोबर महाशिवरात्रीला येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, महाप्रसाद वाटप आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, तालु‌का आरोग्य विभागाने देखील सर्व मंदिरांमध्ये भाविकांना आरोग्यसेवा देण्यासाठी टीम तैनात केल्या आहेत.