
>> अनिल कुलकर्णी
रहिमाबाद येथील हेमाडपंती नागेश्वर महादेव मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली असून ग्रामस्थांच्या वतीने एकदिवसीय यात्रा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, 20 पासून हभप. भगवान महाराज जंजाळ यांनी अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय शिवपुराण कथा सुरू केली आहे. तसेच या कीर्तन सप्ताहात रोज वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तन झाले. दयानंद महाराज व महंत श्री स्वामी जगन्नाथ महाराज गिरी शनिउपासक वेदशास्त्रसंपन्न सदाशिव शास्त्री मंगरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नागेश्वर शिवलिंगास अभिषेक करुन महापूजा, रुद्रयाग व दत्तयाग यज्ञास अग्नी प्रदीप्त करून सुरुवात करण्यात आली. तसेच रात्री कृष्णा महाराज मोकासे पिशोरकर यांची कीर्तन सेवा झाली.
बुधवार, 26 रोजी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी वारकरी सांप्रदायाच्या नेतृत्वात टाळ पखवाजाच्या गजरात, कुमारिका कलश मिरवणुकीसह श्री नागेश्वर शिवलिंगावरील मुखवट्याच्या पालखीची भव्य नगर प्रदिक्षणा करण्यात येऊन दिवसभर यज्ञआहुती सुरु राहणार आहे. रात्री बारा वाजता महारुद्र अभिषेक केला जाणार असून रात्री आठ वाजता हभप. भगवान महाराज जंजाळ यांचे कीर्तन होणार आहे.
गुरुवार, 27 रोजी सकाळी हभप भगवान महाराज जंजाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात येईल व देवतास पूजन पूर्णाहुती होईल. आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसाद देण्यात येऊन यज्ञाची सांगता करण्यात येईल.