
शिवाच्या आराधनेत रममाण होणाऱ्या भक्तांसाठी चंद्रपूरचे अंचलेश्वर मंदिर हे प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री निमित्त या मंदिरात शिवभक्तांची पुजेसाठी मोठी गर्दी उसळते. पंधराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेले आहे. चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर असून या मंदिराच्या गाभाऱ्यात एक नैसर्गिक जलकुंड आहे. ऐतिहासिक मान्यतेनुसार, जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं. तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे. राणी हिराईनं सोळाव्या शतकात या जलकुंडाचं महत्त्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा कायापालट केला. तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीनं महत्त्व प्राप्त झालं. महाशिवरात्री असो वा श्रावण महिना इथं भक्तांची मोठी गर्दी उसळते. ऐतिहासिक नोंदीनुसार हे जलकुंड आजही मंदिराच्या गाभा-यात विद्यमान आहे. त्यात पाणीही आहे. पण आता हे पाणी दूषित होऊ लागले आहे. भाविक या जलकुंडात निर्माल्य टाकत असल्यानं ते तिथंच सडून जातं. दगडातील झ-यामधून इथं पाणी साचतं. अतिशय पवित्र मानलं गेलेलं हे जल आता निर्माल्यामुळं दूषित झालं. गोंड शासकांपासून सुरू झालेली ही पूजेची परंपरा आजही कायम आहे. चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक.
अंचलेश्वर मंदिरात भाविकांसाठी साबुदाणा खिचडी
महाशिवरात्रीच्या निमित्ताने कमल स्पोर्टिंग क्लब च्या वतीने चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर मंदिर परिसरात भाविकांसाठी पहाटे पासूनच उपवासाच्या फराडाची व्यवस्था करण्यात आली आहे. कमल स्पोर्टिंग क्लब चे अध्यक्ष रघुवीर अहिर यांच्या नेतृत्वात मागील 9 वर्षा पासून हा उपक्रम अंचलेश्वर मंदिरात राबविण्यात येत आहे. साबुदाणा खिचडी, केळ व पेढा यावेळी भाविकांना देण्यात येते. सर्व भाविकांना उपवासाच्या फराळाचा लाभ मिळावा या साठी स्पोर्टिंग क्लब चे कार्यकर्ते पहाटे पासूनच परिश्रम घेत असतात.