महाराष्ट्रात ढगाळ वातावरण; मुंबई, पुण्यात अवकाळी सरी बरसल्या, पावसाची शक्यता

तामिळनाडूत आलेल्या फेंगल चक्रीवादळाने राज्यातील वातावरणावरही परिणाम झाला असून ऐन थंडीत अवकाळीच्या सरी बरसत आहेत. फेंगल चक्रीवादळामुळे कोकणातील हवामानातही बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने आबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. ऐन थंडीत अवकाळी पाऊस पडल्यास आंबा मोहराचे नुकसान होणार आहे. तसेच राज्यातील इतर शेती पिकानांही धोका आहे.

कोकणासह मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. फेंगल चक्रीवादळाचा कमी दाबाच्या जोर ओसरत असून आता तो पश्चिम उत्तरेकडे म्हणजे अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई आणि पुण्यात मंगळवारी आणि बुधवारी ढगाळ वातावरण होते. मुंबई आणि पुण्यात बुधवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. राज्यात गेल्या आठवड्यात पारा घसरल्यानंतर थंडीची चाहूल लागली होती. तसेच राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट होत कडाक्याच्या थंडीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, फेंगल चक्रीवादळाने राज्यातीस हवामान बदलले असून राज्यात पुढील तीन चार दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात आता अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने अनेक भागांमधील थंडी गायब झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात आद्रर्ताही वाढली असून प्रचंड उकाडा जाणवत आहे. रात्री आणि पहाटेच्या सुमारास जाणवणारी थंडीही गायब झाली आहे. किमान आणि कमाल तापमानातही वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील तापमान कमाल 28 अंश सेल्सिअस तर किमान 12 -14 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.