मुंबई आमचीच राहणार, महाराष्ट्राचे अदानी राष्ट्र होऊ देणार नाही; आदित्य ठाकरे यांनी महायुतीला ठणकावले

शिवडी विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजय चौधरी यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान सभा घेतली. यावेळी महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहणार की भाजप त्याचे अदानी राष्ट्र करणार, हे ठरणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

ही निवडणूक महाराष्ट्र आणि मुंबईसाठी महत्त्वाची आहे. ही लढाई फक्त शिवसेना नाव आपल्याला परत हवे, चिन्ह परत हवे, यासाठी होत नाही. ही लढाई महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र हे महाराष्ट्रच राहणार की अदानी राष्ट्र होणार, यासाठी ही लढाई आहे. आपण संघर्षातून ही मुंबई मिळवली आहे. ती अदानीच्या घशात घालण्यात येत आहे.

मुंबई, महाराष्ट्राचे भआजप अदानी राष्ट्र करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. धारावी पुनर्वसनाचा मुद्दा फक्त धारीवाचा नाही. त्याचा परिणाम मुंबईवर होणार आहे. तसेच त्याचे राज्यावरही परिणाम होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही लढाई महत्त्वाची आहे. आपल्या राज्यातील पाचसहा मोठे प्रकल्प त्यांनी गुजरातमध्ये पळवले आहे. राज्यातील तरुणांचा रोजगार हिरावला गेला आहे. मुंबई भाजप स्वबळावर जिंकू शकत नाही. मुंबई तोडून, फूट पाडून ती गुजरातला जोडण्याचा प्रयत्नही यशस्वी होत नाही. त्यामुळे आता दोन वर्षे निवडणुका न घेता ते मुंबई लुटत आहेत. मुंबई लुटणाऱ्यांना आपण मते देऊ शकत नाही. त्यांच्यासोबत असलेल्या मिंध्यांना आणि अजित पवार गटाला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या मनसेला आपण मतदान करू शकत नाही. आपण संघर्षातून, रक्त सांडून मिळवलेली मुंबई अदानीला द्यायची नसेल, तर आपल्याला त्यांना मतं द्यायची नाही. आपले कोळीवाडे, गावठाणे अशा सर्व जमीनी अदानीला देण्यात येणार आहे, ही जमीन अदानीला फुकटात देणे मान्य नसेल तर भाजप आणि गद्दारांना आपण मतदान करू शकत नाही.

आता निवडणुका आल्याने त्यांना बहीण लाडकी वाटत आहे. मात्र, बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींची मुक्तता झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला. बदलापूरमध्ये चिमुरडींच्या अत्याचाराची घटना घडली, राज्यात महिला असुरक्षित आहेत, अशा परिस्थितीत त्यांना बहीण आठवली नाही. आता निवडणुका आल्याने त्यांना मतांसाठी बहीणीची आठवण झाली असा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी केला.