महाराष्ट्र विधानसभेचे निकाल अनपेक्षित लागले असून अनेक नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालावर अनेक बाजुंनी शंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हे निकाल अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. आता शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत थेट ईव्हीएम मशीनवरच प्रशनचिन्ह उपस्थित केले आहे. त्यासाठी त्यांनी पोस्टसोबत आकडेवारीही शेअर केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, अशा आशयाची पोस्ट करत 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमधील संख्याबळात सर्वात कमी संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागा मिळाल्या आहेत.
हे बघा आणि तुम्हीच ठरवा
EVM ची कमाल pic.twitter.com/pTpJxYyydC— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 26, 2024
सर्वच पराभूत आमदारांची मंगळवारी बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये, बहुतांश आमदारांनी ईव्हीएममवर संशय घेत निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या पराभूत आमदारांच्या बैठकीत सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका मांडली. यावेळी, आमदारांनी बैठकीत ईव्हीएमबाबत रोष व्यक्त केला. जितेंद्र आव्हाड स्वत: एक लाखांच्या मताधिक्याने निवडून आले असले तरी त्यांनीही ईव्हीएम बाबत रोष व्यक्त केला आहे. त्यातचून, त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विजयी आमदारांच्या नावांची आणि त्यांना मिळालेल्या मतांची यादीच ट्विटरवरुन शेअर केली आहे. तसेच, हे बघा आणि तुम्हीच ठरवा, EVM ची कमाल अशा आशयाचे ट्विट करत ईव्हीएमच्या निकालावर थेट संशय व्यक्त केला आहे.