महारेराने दलालांसाठी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यानुसार रिअल इस्टेट क्षेत्रातील आणखी 5260 दलालांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करून 29 जुलै रोजी राज्यातील 24 केंद्रांवर त्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. यात मुंबई महाप्रदेशातील 3081, पुणे 1533, नागपूर 518, नाशिक 40, छत्रपती संभाजीनगर 28, कोल्हापूर 21, सांगली 20, अमरावती आणि जळगाव प्रत्येकी 7 आणि नांदेड भागातील 5 असे राज्यभरातील दलाल या परीक्षेत सहभागी होणार आहेत.
घर खरेदीदार ग्राहक पहिल्यांदा दलालाच्या संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडून मिळते. या माहितीच्या आधारे ग्राहक घर खरेदीचा निर्णय घेतात. त्यामुळे दलालांचे महत्त्व लक्षात घेऊन महारेराने दलालांना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. आतापर्यंत 4 वेळा झालेल्या परीक्षेत सुमारे 10 हजार दलाल उत्तीर्ण झालेले आहेत.