स्वयंविनियामक संस्थांतील प्रतिनिधींची दोन वर्षांसाठीच नियुक्ती, महारेराचा महत्त्वपूर्ण निर्णय  

महारेराकडे नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीत मदत करणाऱ्या विविध स्वयंविनियामक संस्थांच्या प्रतिनिधींचा कालावधी महारेराने हितसंबंध निर्माण होऊ नये यासाठी जास्तीत जास्त दोन वर्षांचा राहील, असे निश्चित केले आहे. शिवाय हे प्रतिनिधी नोंदणी करताना आवश्यक असलेल्या प्रकल्पाच्या कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक निकषांपैकी किमान एका विषयाचे तज्ञ असावेत, असाही आग्रह महारेराने धरला आहे. ज्या प्रतिनिधींना 2 वर्षे झाली असतील त्यांना तातडीने बदला, असे निर्देशही महारेराने या स्वयंविनियामक संस्थांना पाठविलेल्या पत्रात दिले आहेत.

प्रत्येक नवीन गृहनिर्माण प्रकल्पासाठी, काही अटींसापेक्ष, महारेराकडे नोंदणी करून नोंदणी क्रमांक घेणे बंधनकारक आहे. त्याशिवाय त्या प्रकल्पाची जाहिरात करता येत नाही. विक्री करता येत नाही. कुठल्याही गृहनिर्माण प्रकल्पाचे भविष्य ठरविण्यात प्रकल्पाचे सर्वचबाबतीतील कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून महारेरा नोंदणी क्रमांक देताना या त्रिस्तरीय निकषांवर प्रत्येक प्रस्तावाची छाननी करूनच नोंदणी क्रमांक देते. यात स्वयंविनियामक संस्थांचे महारेरातील प्रतिनिधी आपापल्या सदस्य प्रवर्तकाला नवीन नोंदणीसाठी अधिकृतपणे मदत करतात. छाननीत निघालेले शेरे या प्रतिनिधींना देऊन त्यांना त्याची पूर्तता करून घेण्यास सांगितले जाते. सध्या महारेरात 7 स्वयंविनियामक संस्था कार्यरत आहेत.

स्वयंविनियामक संस्थांच्या सदस्य प्रवर्तकांना प्रभावीपणे मदत व्हावी यासाठी त्यांनी कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक घटकांपैकी किमान एकाचे तज्ञ असलेले  प्रतिनिधी नेमावेत.  महारेरात या प्रतिनिधींना तांत्रिकदृष्टय़ा एकच जागा उपलब्ध करून देणे शक्य असल्याने त्यांनी आपले हे प्रतिनिधी गरजेनुसार आळीपाळीने उपस्थित राहतील याची त्यांच्या पातळीवर व्यवस्थित काळजी घ्यावी, असेही आवाहन महारेराने या पत्रात केले आहे.