महारेराने घर खरेदीदारांना दिलासा दिला असून आतापर्यंत घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईचे तब्बल 200 कोटी रुपये वसूल केले आहेत. राज्यातील 442 प्रकल्पांतील 705 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी महारेराने 1163 वॉरंट जारी केलेले आहेत. यापैकी आतापर्यंत 139 प्रकल्पांतील 283 वॉरंटस्पोटी एकूण 200 कोटी रुपये वसूल केले आहेत.
घर खरेदीदारांच्या विविध स्वरूपाच्या तक्रारींवर रीतसर सुनावणी होऊन प्रकरणपरत्वे व्याज, नुकसानभरपाई, परतावा आदी विहित कालावधीत देण्याचे आदेश संबंधित विकासकांना दिले जातात. दिलेल्या कालावधीत विकासकांनी रक्कम दिली नाही, तर ती वसूल करून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची महत्त्वाची भूमिका असते. महारेराने गेल्या वर्षी जानेवारीत घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईच्या वसुलीसाठी सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. ते सातत्याने सर्व संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्कात असतात. गरजेनुसार महारेरा संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांना सुनावणीसाठी पाचारण करून त्या-त्या जिह्यातील नुकसानभरपाईची वसुली मार्गी लावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते.
सर्वाधिक वसुली मुंबई उपनगरातून
महारेराने वसूल केलेल्या 200 कोटी रुपयांपैकी सर्वाधिक म्हणजे 76.33 कोटी रुपयांची वसुली मुंबई उपनगरातून झाली आहे. यापाठोपाठ मुंबई शहर 46.47 कोटी, पुणे 39.10 कोटी, ठाणे 11.65 कोटी, नागपूर 9.65 कोटी, रायगड 7.49 कोटी, पालघर 4.49 कोटी, छत्रपती संभाजीनगर 3.84 कोटी रुपये, नाशिक 1.12 कोटी आणि चंद्रपूरमधून 9 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.