Maharastra Assembly Election 2024 : मुंबादेवीचा कौल महाविकास आघाडीला

>> शिल्पा सुर्वे

मुंबईची ग्रामदेवता आई मुंबादेवीच्या नावावरून या मतदारसंघाला मुंबादेवी हे नाव पडले. मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमीन पटेल हे विद्यमान आमदार आहेत. अमीन पटेल यांनी याआधी विजयाची हॅट्ट्रिक केलेली आहे. आता चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 पासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. या वेळी मिंधे गटाने भाजपच्या शायना एनसी यांना पक्षप्रवेश देऊन मुंबादेवी मतदारसंघातून तिकीट दिले. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यावरून स्थानिक भाजप नेते अतुल शाह यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. निवडणूक म्हणजे संगीतखुर्चीचा खेळ आहे का? असा संतप्त सवाल नाराज अतुल शाह यांनी भाजपला विचारला होता. भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका शायना एनसी यांना बसू शकतो. मुंबादेवी मतदारसंघात या वेळी एमआयएमने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे मुस्लिम मतदारांची विभागणी न होता एकगठ्ठा मुस्लिम मते अमीन पटेल यांना मिळतील असे म्हटले जाते, तर मनसेनेही आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे थेट लढत अमीन पटेल आणि शायना एनसी यांच्यात आहे. त्यातही सलग तीन टर्म निवडणूक जिंकणाऱया अमीन पटेल यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्याबाबत प्रो-इन्कम्बसी दिसून येतेय. त्यामुळे मुंबादेवीचा कौल महाविकास आघाडीला मिळणार असेच चित्र आहे.

विजयाचे गणित जुळणार

मुंबादेवी मतदारसंघातील भेंडी बाजार, नळ बाजार, चोर बाजार, मोहम्मद अली मार्ग, डोंगरी, उमरखाडी, नागपाडय़ाचा काही भाग हा मुस्लिमबहुल आहे. कामाठीपुरा, दुर्गादेवी-कुंभारवाडा, सुतार गल्ली, सी. पी. टँक या भागांत मराठी, गुजराती, मारवाडी मतदार आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे हक्काचे मराठी मतदार आहेत. मराठी मते निर्णायक ठरून महाविकास आघाडीचे अमीन पटेल विजयी होतील, असे चित्र आहे.

महाविकास आघाडीची कामे जोरात

– महाविकास आघाडीच्या प्रयत्नांतून कामाठीपुराच्या पुनर्विकासाला लवकरच सुरुवात होणार असून प्रत्येक भाडेकरूला हक्काचे 500 चौरस फुटांचे घर मिळणार आहे.
– अमीन पटेल यांच्या प्रयत्नातून मुंबादेवी मतदारसंघात दोन मोठी रुग्णालये बांधण्यात येत आहेत. गौराबाई मॅटरनिटी हॉस्पिटल हे 12 मजल्यांचे 130 बेड्सचे रुग्णालय बांधले जाणार आहे. तसेच सिद्धार्थ मुरली देवरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक सेवा व उपकरण असलेले 17 मजली हॉस्पिटल बांधण्यात येत आहे.
– मुंबादेवीतील सहा मुंबई पब्लिक स्कूलमध्ये एनजीओंच्या मदतीने सुमारे तीन हजार मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. लवकरच दुर्गादेवी आणि इस्लामपुरा येथे दोन नवीन शाळा बांधल्या जाणार आहेत.