लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा, लाडक्या जनतेवरही करांचा बोजा; राज्याचा आज अर्थसंकल्प

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांच्या अंमलबजावणीमुळे सध्या तिजोरीत सरकारी खडखडाट आहे. त्यामुळे उद्या सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात मद्यावरील शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, इंधनावरील करात वाढ होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर होईल. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री आशीष जयस्वाल दुपारी 2 वा. अर्थसंकल्प विधान परिषदेत मांडतील. तिजोरीवर भार टाकणाऱया नव्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात होण्याची शक्यता कमी आहे.

  • लाडक्या बहिणींना महिना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आणि निराधार महिला, वृद्धांना मिळणारे दरमहा निवृत्तीवेतन 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते, पण या आश्वासनांची पूर्तता शक्य दिसत नाही.

इंधनावरील मूल्यवर्धित कर पुन्हा?

गेल्या वर्षी सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱया मूल्यवर्धित करात कपात केली होती. हा निर्णय मागे घेऊन इंधनावरील कर गेल्या वर्षीप्रमाणे जैसे थे ठेवला जाऊ शकतो किंवा त्यात वाढ होऊ शकते. याशिवाय थकबाकीदार व्यापारी, उद्योजक यांच्याकडील कर वसुलीसाठी नवी अभय योजना घोषित केली जाऊ शकते.