‘उष्ण’ राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर, विदर्भात दीड महिना उष्णतेची लाट कायम; अनेक भागांतील तापमान ‘चाळिशी’पार

यंदा उष्णतेने महाराष्ट्राची प्रचंड दमछाक केली आहे. राज्याच्या अनेक भागांतील तापमान वारंवार ‘चाळिशी’पार गेल्याने देशातील ‘उष्ण’ राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर आहे. विदर्भात दीड महिना उष्णतेची लाट कायम राहिली आहे. त्यामुळे नागरिक वैशाख वणव्यापेक्षा अधिक तीव्रतेची होरपळ सोसत आहेत. मार्चच्या मध्यावर ही स्थिती असेल, मग मे महिन्यात किती तीव्र रखरखाट सहन करावा लागेल? अशी चिंता नागरिक व्यक्त करीत आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) रविवारी उष्णतेच्या लाटेबाबत नवीन अलर्ट जारी केला. त्यात महाराष्ट्रातील विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे भाकीत केले आहे. विदर्भात फेब्रुवारी महिन्यापासून उष्णतेच्या लाटेचे चटके बसत आहेत. शनिवारी चंद्रपूरमध्ये 42 अंश तापमान नोंद झाले. हे तापमान देशात सर्वाधिक तापमान नोंद झालेल्या ओडिशातील बौधच्या जवळपास होते. बौधमध्ये 42.5 इतके सर्वोच्च तापमान नोंद झाले. महाराष्ट्रातील अनेक भागांत 40 ते 42 अंशांच्या दरम्यान कमाल तापमान नोंद होऊ लागले आहे. पुणे, नागपूरमध्ये रविवारी सलग चौथ्या दिवशी तापमान 40 अंशांच्या वर गेले. त्यामुळे देशातील ‘उष्ण’ राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर-मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, रायलसीमा, दक्षिण मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा या भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

मुंबईच्या तापमानात घट

ग्रामीण भागांत उष्णतेचा कहर असताना मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवडय़ात चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या मुंबईच्या तापमानात मोठी घट झाली. रविवारी सांताक्रुझमध्ये 34.2 अंश आणि कुलाब्यात 31.6 अंश कमाल तापमान नोंद झाले.

राज्यातील तापमान

चंद्रपूर 42 अंश
बीड 41 अंश
परभणी 40 अंश
अकोला 41.3 अंश
वर्धा 41 अंश
ब्रह्मपुरी 40.8 अंश
अमरावती 40.4 अंश
नागपूर 40.2 अंश
सोलापूर 40.3 अंश