गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी ‘एक्स’वर ईव्हीएमचा एक संशयास्पद व्हिडिओ शेअर करत हा प्रश्न उपस्थित केला आहे.
‘एक्स’वर पोस्ट करत रोहित पवार म्हणाले की, ”राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर आम्ही शंका घेतली असता अनेक लोक व्हीव्हीपॅट मशीन दाखवून तुम्ही हवे तेव्हा व्हीव्हीपॅटचिठ्ठ्या तपासू शकता, असे सांगतात. मात्र गुजरातमध्ये बनलेल्या या मशीनमध्ये चिठ्ठी फक्त दिसते, खाली पडत नाही. म्हणजेच व्हीव्हीपॅट मशीनसोबत देखील छेडछाड करण्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रतील जनतेच्या मनातील अशा सर्व शंकांचे निरसन निवडणूक आयोगाकडून होणे गरजेचे आहे.”
ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आणखी एक ‘एक्स’ पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, ”लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवल्यानंतर बोगसगिरीशिवाय पर्याय नाही, हे कळालेल्या महायुतीने निवडणुकीत अनेक उपद्वाप केले. याचाच एक भाग म्हणजे महायुती बोगस मतदार नोंदणी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर मविआच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार देखील केली होती. पण याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. इतकेच नाही तर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने बोगस मतदार नोंदणी बाबत घेतलेल्या शंकेचं देखील निरसन झाले नाही. परिणामी विधानसभेला मतांची टक्केवारी वाढवण्यात आली. ही मतांची टक्केवारी वाढवताना ईव्हीएम मशीनचा सहभाग देखील संशयास्पद असल्याचं दिसून आलं.”
ते म्हणाले, ”एकंदरीत काय तर महाराष्ट्रातील जनभावना महाविकास आघाडीसोबत असल्याची दिसल्याने भाजपने गुजराती ईव्हीएमच्या मदतीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालण्याचं काम केलं. यामध्ये निवडणूक आयोगाने भाजपला साथ दिली. आतातरी आयोग लोकशाहीच्या मुळ तत्वांचा विचार करून खरी परिस्थिती जनतेसमोर मांडणार का?”
गुजराती #EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का?
राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर आम्ही शंका घेतली असता अनेक लोक #VVPAT मशीन दाखवून तुम्ही हवे तेव्हा VVPAT चिठ्ठ्या तपासू शकता असे सांगतात, मात्र गुजरातमध्ये बनलेल्या या मशीनमध्ये चिठ्ठी फक्त दिसते खाली पडत नाही. म्हणजेच… pic.twitter.com/LoF49PqQtq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 28, 2024