महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई होणार सरन्यायाधीश, 14 मे रोजी घेणार पदाची शपथ

महाराष्ट्राचे सुपुत्र तथा सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे 52 वे सरन्यायाधीश बनणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती गवई यांना सरन्यायाधीश पदाचा बहुमान मिळणार आहे. पुढील महिन्यात, 14 मे रोजी न्यायमूर्ती गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.

न्यायमूर्ती गवई हे मूळचे अमरावती येथील आहेत. त्यांच्याकडे कायद्याचे सखोल ज्ञान, नेतृत्वगुण आणि न्यायमूर्ती पदाचा गाढा अनुभव आहे. त्यांनी 1990 मध्ये बॅरिस्टर राजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत वकिलीला सुरुवात केली. नंतर ते नागपूरला स्थायिक झाले. तसेच 14 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयात पदोन्नती मिळाली होती. त्यापूर्वी ते नागपूर येथे सरकारी वकील कार्यालयाचे प्रमुख होते. येत्या 14 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ते 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. 14 मेपासून 23 नोव्हेंबरपर्यंत त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ असणार आहे. त्यांनी आतापर्यंतच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत निकाल दिला आहे. बुलडोझर कारवाईसारख्या सरकारच्या मनमानी धोरणांवर परखड भाष्य केले आहे. त्यांची भावी सरन्यायाधीश म्हणून निवड झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र तसेच देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.