केंद्रातील भाजप सरकारची घमेंड मोडण्याचे काम महाराष्ट्राने केले; बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांसह येथील चांगल्या वातावरणामुळे तालुक्याचा लौकिक निर्माण झाला आहे. सततच्या विकास कामातून येणाऱ्या विधानसभेतही मोठे यश मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार, असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. केंद्रातील भाजप सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरवली असून राज्य सरकारच्या निवडणुकीपुरत्या असणाऱ्या फसव्या घोषणांना फसू नका, असे आवाहनही बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

चंदनापुरी येथे थोरात यांच्या प्रयत्नातून पाच कोटी सत्तावीस लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. याप्रसंगी थोरात म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडी, सीबीआयसारख्या संस्था गुलाम बनवल्या. त्यातून दबावाचे राजकारण सुरू केले. देशात महागाई, बेरोजगारी वाढली असून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. मात्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही. जातिभेद आणि घमेंड असणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आणि जनतेने केले आहे.

राज्यात आलेले सरकार जनतेला मान्य नाही. त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून संगमनेर मधूनही मोठे यश मिळणार आहे. 1985 पासून तालुक्यातील जनतेने खूप प्रेम केले. त्यामुळे राज्यात मिळालेल्या मोठ्या संधीचा सर्वसामान्यांच्या विकासासाठी उपयोग केला. निळवंडे धरण, कालवे यांच्यासह अनेक कामे मार्गी लावली. सतत काम करत राहणे हे आपले वैशिष्ट्य आहे. राज्यात शरद पवार ,उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपल्याला मान मिळतो आहे हे जनतेचे प्रेम असून आगामी काळामध्ये सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. थोरात हे अत्यंत नम्र स्वभावाचे व सर्वांना स्वातंत्र्य देणारे नेतृत्व आगामी काळामध्ये नाशिक पुणे रेल्वे संगमनेर वरूनच जाण्याकरता आपण दिल्ली दरबारी पाठपुरावा करू असेही ते म्हणाले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकासाची गंगा आली आहे. त्यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन काम केल्याने तालुक्याचे कुटुंबप्रमुख म्हणून आपण सर्वजण त्यांचा आदर करतो. मनाचा मोठेपणा असलेले आमदार थोरात हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील सर्वात पुढचे नाव असून सर्वांनी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करावे असे आवाहन केले.

आमदार थोरात व मान्यवरांची भव्य वाजत गाजत मिरवणूक
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून पाच कोटी सत्तावीस लाख रुपये निधीच्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी चंदनापुरी ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची पारंपारिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढली. यावेळी ढोल ताशांचा गजर ,लेझीम पथक, आणि पारंपारिक वेशभूषेतील युवक याचबरोबर भव्यदिव्य झालेली मिरवणूक ही लक्षवेधी ठरली.