
महाराष्ट्राच्या पोरींनी किताबी लढतीत यजमान गुजरातचा 40 धावांनी धुव्वा उडवत पश्चिम विभागीय 17 वर्षांखालील महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. भाविका अहिरेची (83) अर्धशतकी खेळी आणि वैष्णवी म्हाळस्करची (4 बळी) भन्नाट गोलंदाजी ही महाराष्ट्राच्या जेतेपदाची वैशिष्टय़े ठरली.
अहमदाबाद (गुजरात) येथे ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्राकडून मिळालेल्या 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा डाव 39.5 षटकांत 155 धावांतच गारद झाला. त्यांच्याकडून कर्णधार चार्ली सोलंकी (59) हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 80 चेंडूंत 8 चौकार लगावले. मधल्या फळीतील दिया वर्धमानी (21) ही आणखी एक धावांची विशी ओलांडणारी फलंदाज ठरली. इतर फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजीपुढे शरणागती पत्करल्याने गुजरातला मोठय़ा पराभवासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राकडून वैष्णवी म्हाळस्कर हिने 23 धावांत 4 बळी टिपत गुजरातची दाणादाण उडविली. जान्हवी विरकर व रोशनी पारधी यांनी 2-2 बळी टिपले. याचबरोबर गायत्री सुरवसे व कर्णधार ईश्वरी अवसरे यांनी 1-1 फलंदाज बाद केला.
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने निर्धारित 40 षटकांत 8 बाद 195 धावसंख्या उभारली. यात भाविका अहिरे हिने 100 चेंडूंत 9 चौकार व एका षटकारासह 83 धावा फटकावल्या. मधल्या फळीतील मयूरी थोरात हिने 65 चेंडूंत 3 चौकारांसह 42 धावांची खेळी केली. कर्णधार ईश्वरी अवरसे (17) व निकिता सिंग (10) या इतर दुहेरी धावा करणाऱ्या फलंदाज ठरल्या. गुजरातकडून पायलने 3, तर गौरी गोयलने 2 फलंदाज बाद केल्या. रिया पटेल व हरिश्री बराटे यांना 1-1 बळी मिळाला.