महाराष्ट्रद्वेषी भाजपला राज्यातून एकही मत मिळणार नाही, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

भाजप हा महाराष्ट्रद्वेषी पक्ष आहे. त्यांनी महाराष्ट्रविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना आता राज्यातून एकही मत मिळणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. पालघरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित होते.

महाराष्ट्रातून 40 जागा जिंकण्याच्या अमित शहा यांच्या विधानाला जोरदार प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजप हा महाराष्ट्रद्वेषी पक्ष आहे. त्यांनी ज्या काही महाराष्ट्रविरोधी कारवाया केल्या आहेत, त्यामुळे त्यांना यावेळी राज्यातून एकही मत मिळणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपने आता प्रज्ज्वल रेवन्नावर बोलायला हवं. ज्या प्रज्ज्वल रेवण्णासाठी मोदींनी मतं मागितली त्याने इतकं नीच काम केलं. आपल्या देशातल्या महिला त्यामुळे सुरक्षित नाहीत. केंद्र सरकारमध्ये भाजप असताना त्यांनी प्रज्ज्वल रेवण्णाला देशाबाहेर का जाऊ दिलं याचं उत्तर त्यांनी पहिल्यांदा द्यावं. असा राक्षसी माणूस त्यांच्या बाजून निवडणुकीला उभा राहिला तरी भाजपामधून त्याच्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

शिवसेनेतून जे डरपोक लोक आम्हाला सोडून गेले, त्या गद्दारांमुळे आम्हाला काही फटका बसणार नाही. आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत, भारताचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत, पालघर लोकसभेचा महायुतीने अजूनही उमेदवार जाहीर केला नसून ईडी, सीबीआय आता कोणता उमेदवार ठरवते हे पाहावं लागेल असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.