राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज; काही ठिकाणी दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

राज्यात उन्हाचे चटके असह्य झाले असताना आता हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. या अवकाळी पावसाचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. यंदा आंब्याचा पहिला मोहर वांझ ठरल्याने आंब्यांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहेत. त्यातच या पावसाने आंब्यांचे उत्पादन आणखी घटण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्याला 1 आणि 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर आठ शहरांना मंगळवार आणि बुधवारी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या पावसाने उष्णतेपासून थोडा दिलासा मिळणार आहे. सरासरी तापमानात 5 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर उकाड्यात पुन्हा वाढ होणार आहे. एप्रिल ते जूनदरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असाही अंदाज वर्तवला आहे.

हिमालय ते उत्तर हिंदुस्थानात पश्चिमी चक्रवात सक्रिय आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. हिमालयापासून ते देशाचा ईशान्य भाग, मध्य भाग, मध्य प्रदेश महाराष्ट्र ते दक्षिण भाग असा संपूर्ण देशात वळवाचा प्रभाव 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे. महाराष्ट्रात 1 ते 2 एप्रिल रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुणे, सातारा, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, गोंदिया या ठिकाणी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई आणि उपनगरे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.