राज्यात थंडीने जोर पकडला असतानाच वातावरणातील बदलामुळे राज्यात अचानक पावसाळी वातावरण तयार झाले आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आणि लगतच्या परिसरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर संध्याकाळी तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ पाऊस पडण्यास सुरवात झाली. थंडी, पाऊस, पुन्हा थंडीचा संमिश्र आठवडा असा अनुभव या आठवड्यात येणार असल्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या आठवड्यात मुंबई, ठाणे, पालघर कोकणसह राज्यात थंडी गायब झाली असून काही ठिकाणी गारवा जाणवत आहे.
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये काही ठिकाणी रात्री आणि पहाटेच्या वेळी गारवा जाणवत आहे. मात्र, मुंबईत प्रदूषणात वाढ झाल्याने दृश्यमानता कमी झाली आहे. तसेच अनेकांना श्वसनाचे विकार जाणवत आहे. नवीन वर्षात थंडीत वाढ झाल्यानंतर प्रदूषण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पाऊस दोन दिवसांत थांबेल आणि राज्यात थंडी पुन्हा परतणार आहे. हिवाळ्यात अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात बदल जाणवला असून तापमानातही घट झाली आहे. सध्या वातावरणात झालेल्या घडामोडींमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्षाअखेरीस 30 डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होत नववर्षाच्या सुरुवातील राज्यात पुन्हा थंडीचे आगमन होणार आहे. पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून राज्यात काही ठिकाणी गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हिवाळ्याच्या ऋतूत अचानक पावसाची हजेरी लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुण्यात शिवाजीनगर, घोरपडीमध्ये देखील किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडला. तर राज्यातील इतर भागातही पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने राज्यातील नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलडाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, गोंदिया, आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली आहे.
राज्यात अनेक भागांमध्ये वादळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशिम, अमरावती, नागपूर, तसेच मराठवाड्यातील काही भागांतील गहू, हरभरा आणि कांद्याच्या पिकांवर परिणाम झाला आहे. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.