पुणे शहर परिसरात सोमवारी मध्यरात्रीनंतर मंगळवारी दुपारीदेखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांतील रस्ते जलमय झाले होते. परिणामी, मध्यभागातील रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांवर नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात बुधवारी हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि. २४) दुपारी मुसळधार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चांगला पाऊस कोसळला. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते. सुमारे एक तासापेक्षा जास्त कोसळणारा पाऊस पुणे शहरसह उपनगरांतदेखील बरसत होता. सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, लष्कर परिसर, हडपसर, कात्रज, लोहगाव अशा सर्वच परिसरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह कात्रज कोंढवा रस्त्यासह नगर रस्ता, सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत वडगाव शेरी 37.5 हडपसर 28.5, शिवाजीनगर 19.2, कोरेगाव पार्क 19, पाषाण 11.6, चिंचवड 11.5, पुरंदर 8, दौंड भागांत चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली.