तापमान 40 अंशांवर पोहचले; उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याचा अवकाळीचा इशारा

फेब्रुवारी महिना संपत आला असताना आता राज्यात उन्हाचे चटके जाणवत आहेत. राज्यात आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. मात्र, आता उन्हाळा सुरू होत असतानाच हवामान खात्याने राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळे राज्यात कोकण किनारपट्टी. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवड्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यात इतरत्र कोरडे हवामान असण्याची शक्यता आहे.

देशातील ईशान्य भागात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. होळीनंतर उन्हाचे चटके जाणवण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा फेब्रुवारीच्या अखेरीसच उन्हाचे चटके जाणवत आहेत. राज्यात उन्हाच्या झळ्या तीव्र झाल्या आहे. सर्वाधिक तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ईशान्य भागात चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मेघालय, पश्चिम बंगाल,ओडिशा या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सरकल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या दोन दिवसात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर राज्यात इतरत्र कडाक्याचे ऊन आणि शुष्क वाऱ्यामुळे तापमानवाढीचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच इतर ठिकाणी कोरडे वातवरण असल्याने उन्हाचा चटका जाणवणार आहे.