वरुणराजा आणखी तीन-चार दिवस बरसणार; मुंबई, रायगड, रत्नागिरीला अलर्ट जारी

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसाची चांगली बॅटिंग सुरू आहे. मुंबईसह कोकणात पावसाचने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारीही मुंबई आणि उपनगरात पावसाची जोर अधूनमधून वाढत होता. आता आणखी तीनचार दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असून हवामान खात्याने मुंबईसह रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच या काही रेड अलर्ट जारी केला आहे.

मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह कोकणातील रत्नागिरी, सातारा, विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे. या जिल्ह्यात मुसळधरा ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 3,4 दिवस राज्यातील मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी परिसर जलमय झाला आहे. खेड येथे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड शहराला पूराचा धोका आहे. राजापूरातील कोदवली नदीनेही इशारा पातळी ओलांडली आहे. गेले काही दिवस रत्नागिरी शहराला मुसळधार पावसाने झोडपले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 894.10 मिमी पाऊस पडला. त्यामध्ये मंडणगड 83.90 मिमी, दापोली 90.60 मिमी, खेड 96.50 मिमी, गुहागर 90.90 मिमी, चिपळूण 84.60 मिमी, संगमेश्वर 121.50 मिमी, रत्नागिरी 132.40 मिमी, लांजा 91.30 मिमी आणि राजापूरमध्ये 102.40 मिमी पाऊस पडला. राजापूर मंडळ 120 मिमी, ओणी मंडळ 136 मिमी, कुंभवडे मंडळ 144 मिमी, नाटे मंडळ 191 मिमी, जैतापूर मंडळ 187 मिमी, कोंडये तर्फे सौंदळ 138 मिमी, पाचल मंडळ 147 मिमी तर सौंदळ मंडळात 139 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

मुंबईमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच गेल्या 24 तासात मुंबईत कुलाबामध्ये 114.7 मिमी, सांताक्रुझमध्ये 92.9 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तसेच शनिवारी सकाळी 11.28 वाजता 424 मीटर, सायंकाळी 5.33 वाजता 2.02 मीटर उंचीचा लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेने पुढील 24 तासांकरीता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.