
देशभरात उष्णतेचा प्रकोप दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेने आतापर्यंतचे विक्रम मोडले असून राजधानी दिल्लीत कालचा दिवस सर्वाधिक उष्ण ठरला आहे. मात्र, राज्यात ढगाळ वातावरणामुळे काल तापमानात थोडीशी घट झाली आहे. आता आठवडाभर राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज असून त्यामुळे राज्यातील जनतेने उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
ऐन ऊन्हाळ्यात अवकाळी पावसाचे संकट राज्यावर कायम आहे. गेल्या आठवड्यात विदर्भाला वाढत्या तापमानामुळे चटके बसत होते. मात्र, आता विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून सोमवारी अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, यासह ताशी 50 ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यातील कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट झाली. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा तसेच सोलापूरसह विदर्भात नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ भागातील तापमानाचा पारा उतरला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने तापमानाचा पारा घसरला असला तरी उकाडा जाणवणार आहे. मात्र, येत्या आठवड्यात वाढत्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
उष्णतेच्या लाटेने त्रस्त असलेल्या दिल्ली आणि उत्तर हिंदुस्थानात 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान पावसाची शक्यता आहे. या काळात, गारपीट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे. या बदलामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे 28 एप्रिलपासून उत्तर प्रदेशातील हवामान बदलणार आहे. या काळात, अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. यासोबतच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.