राज्यात थंडीची चाहूल, अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढणार; हवामान खात्याचा इशारा

दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात थंडीची चाहूल लागते. मात्र, यंदा दिवाळी उलटून गेल्यावरही थंडीची चाहूल लागली नव्हती. आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडीची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आता राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या आणि रात्रीच्या सरासरी तापमानात घट होत आहे. त्यामुळे राज्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढत आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिमाण होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात तापमानात मोठी घट होत आहे. रात्रीची थंडी वाढल्याने अनेक जिल्हे गारठले आहेत. पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. कमाल तापमानात 1 ते 2 अंशांची घट झाली आहे. आता डिसेंबर महिन्यात थंडीत आणखी वाढ होणार असून काही जिल्ह्यात हुडहुडी वाढणार आहे.

नोव्हेंबर महिना सुरु झाल्यापासून तापमानात चढ-उतार होत आहे. आता किमान तापमानात घट झाली असून नीचांकी किमान तापमान 12.2 अंश नोंदले गेले होते. सोमवारी पुण्यात 12.1 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात घट झाली आहे.