उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यात धडकणार; येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका वाढणार

नववर्षात राज्यात थंडीचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानुसार आता राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यात येत असल्याने राज्यात हुडहुडी भरवण्याची थंडी जाणवणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उत्तरेकून येणाऱ्या अतिशीत वाऱ्यांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. त्यामुळे राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान 11 अंशांच्या खाली गेले आहे. तर मुंबईचे किमान तापमान 16 अंशापर्यंत खाली आले आहे. तसेच पुढील तीन दिवस थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. दिवसा पूर्वेकडून उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे दिवसाचे तापमान अधिक आहे, तर रात्रीचे तापमान कमी आहे. मात्र, आता उत्तरेडील अतिशीत वाऱ्यांचा जोर वाढल्याने थंडीत वाढ होणार आहे.

यंदा थंडीला सुरुवात झाल्याने हवामानात झालेल्या बदलांमुळे तापमानात चढ उतार होत होते. तसेच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे थंडी कमी झाली होती. आता उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढत आहे. थंडीत वाढ झाल्यामुळे मुंबईचे किमान तापमान 14 अंशांपर्यंत खाली आले आहे. शुक्रवारपासून पहाटेच्या किमान तापमानात घसरण होत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे मुंबई, कोकणसह राज्यात थंडीत वाढ होत आहे.आगामी काळात थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.