महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट; उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कडाका कायम, जम्मू-कश्मीर गोठले

फेंगल चक्रीवादळाचा परिणाम राज्यावरही झाला असून राज्यात तापमानात वाढ झाली आहे. तसेच पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रासह काही जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. आता राज्यात पुढील तीन दिवस अवकाळीचे सावट आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

गेल्या आठवड्यापासून राज्यात गारठा जाणवण्यास सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणी सरासरी तापमानातही मोठी घट झाली होती. मात्र, फेंगल चक्रीवादळाने राज्यातील हवामान बदलले असून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अकाळी पावसाने कोकणात आंब्याच्या मोहराचे आणि राज्यातील शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

राज्यातील हवामानात बदल झाले असले तरी उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट कायम आहे. राजस्थान, बिहारचा काही भाग आणि जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. काश्मीरच्या अनेक भागांत पारा शून्याखाली उतरला आहे. बिहारमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेली थंडीची लाट कायम असून, राजस्थानात हा प्रकोप अधिक जाणवत आहेत. रविवारी माऊंट आबूमध्ये सर्वांत कमी 7.4 अंश तापमान नोंदवले गेले. जम्मू कश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे कश्मीर गोठले आहे. काही भागांत शनिवारी काही झालेल्या बर्फवृष्टीनंतर काश्मीरमध्ये रविवारी दिवसभर दाट धुक्याचे साम्राज्य होते. त्यामुळे अनेक भागांत पारा शून्याखाली उतरला, तर दृश्यमानता 50 मीटरवर आली. श्रीनगरमध्ये उणे 1.3 अंश तापमानाची नोंद झाली.