विधिमंडळात आज दिवसभर विधान परिषद निवडणुकीचा माहौल आहे. सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांनी मतदानाला हजेरी लावली. या निमित्ताने मतदानासाठी आलेल्या आमदारांच्या आणि नेत्यांच्या विधानभवनातील धावत्या भेटींनी चर्चा रंगल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते खासदार संजय राऊतही विधानभवनात पोहोचले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 274 आमदारांनी मतदान केले. या निवडणुकीत 100 टक्के मतदान झाले आहे. यादरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या इमारतीमधील राजकारण पूर्ण बदललं आहे. आणि आज लागणारे निकाल हे पुढल्या चार महिन्यांनंतर लागणाऱ्या निकालाची नांदी असेल. मागच्या निवडणुकीवेळी इथून काही लोक पळून गेले. मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर याच इमारतीतून काही लोकांनी पळ काढला. आजच्या निकालानंतर कोण पळून कुठे जाताहेत, हे तुम्हाल संध्याकाळी कळेल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील हे आमचेच उमेदवार आहेत. तिन्ही उमेदवार अगदी व्यवस्थित निवडून येथील अशा पद्धतीने आम्ही मतदान केलेलं आहे. तुम्हा संध्याकाळी हे चित्र स्पष्ट झालेलं दिसेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. कोण पडेल हे सांगू शकत नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या स्वतःच्या तीन जागा जिंकतोय, असे संजय राऊत यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
राजकारणामध्ये आम्ही दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटतो, अमित शहाही लॉबित भेटतात. आम्ही हस्तांदोलन करतो, गप्पा मारतो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलेलं आहे. चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत. त्यांचं आमचं काय व्यक्तीगत भांडण आहे का? हे भांडण राजकीयही नाही. हे वैचारिक भांडण आहे आणि ते तसंच राहील. आम्हाला बघून प्रत्येकाला मागे फिरावचं लागेल, हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल, असे संजय राऊत म्हणाले.
मला आज अजित पवार भेटले, जंयत पाटील, शेकापचे जयंत पाटीलही भेटले, रमेश चिंथेला भेटले. काँग्रेसचे सगळे नेते, राष्ट्रवादीचे नेते भेटले. ते उद्धव ठाकरे यांनाही भेटले. विधानभवनात चांगला माहौल आहे ना? आणि तो तसाच रहायला हवा. महाराष्ट्राची परंपरा आहे. या महाराष्ट्रात राजकारणामध्ये विषाचा प्रवाह कोणी सुरू केला असेल तर तो दुर्दैवाने भाजपने सुरू केला. नाहीतर महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत निर्मळ होतं, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.