तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, 18 वर्षांत 21 बदल्या! आता ‘ही’ मोठी जबाबदारी पार पाडणार

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे.

सामान्यांमध्ये लोकप्रिय असलेले आणि राजकारण्यांना न जुमाणनारे प्रशासकीय अधिकारी म्हणून तुकराम मुंढे यांची ओळख आहे. शिस्त आणि नियमांचे काटेकोरपणे पालन या त्यांच्या तत्वांमुळे राजकारण्यांसोबत त्यांचे बऱ्याच वेळा खटके उडाले आहेत. त्यामुळेच सातत्याने बदली होणारे अधिकारी अशी आगळीवेगळी ओळख त्यांची महाराष्ट्रात निर्माण झाली. ऑगस्ट 2005 साली सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आणि प्रामुख्याने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीलाही तेव्हाच सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला. तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सचिवपद भुषवले आहे. विशेष म्हणजे 2022 या एका वर्षात चार वेळा विविध विभागांमध्ये त्यांची बदली करण्यात आली होती. तुकाराम मुंढे यांची 18 वर्षांच्या कारकीर्दीत जवळपास 21 वेळा बदली झाली आहे.

जून 2023 मध्ये राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा त्यांची बदली करण्यात आली असून राज्याच्या विकास आयुक्त (असंघटित कामगार) सचिवपदी त्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय सेवा अपर मुख्य सचिव नितीन गर्दे यांच्या सहीने तुकाराम मुंडे यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.