
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना यांच्या वतीने राज्य परिवहन महामंडळ कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची पूर्तता होण्यासाठी राज्यभर निदर्शने, आंदोलने बुधवारी (5 मार्च 2025) सकाळी करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून देवगड बस स्थानकाबाहेर देवगड आगारातील कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून आपल्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी केली.
राज्य अध्यक्ष संदीप शिंदे आणि सचिव हनुमंत ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर सुरू असलेली आंदोलने देवगड आगारासमोर एसटी कामगार संघटना अध्यक्ष अनिकेत इंदप, सचिव कल्पेश कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रमुख मागण्यांमध्ये कार्यशाळा कर्मचाऱ्यांचे कमतरता भरून काढा, सन 2016 ते 2020 या कालावधीसाठी जाहीर केलेली वेतन वाढ यातील मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्त्याचा दर 24 करून थकबाकी त्वरित अदा करा, सन 2018 ची महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा मा. न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन कामगारांचा महागाई भत्ता 53 टक्के करून थकबाकीसह त्वरित देण्यात यावा, सर्व देय थकबाकी रकमेच्या अधिन राहून कामगारांना सध्या मिळत असलेली वाढीव थकबाकी रक्कम पूर्वीप्रमाणे माहे मार्च 2025 पासून पुढे तसेच सुरू ठेवण्यात यावी, कार्यशाळेला स्पेअर पार्ट पुरवठा करावा, भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगारांच्या मागणीनुसार त्वरित उचल द्यावी, त्याचबरोबर खात्याअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या कामगारांना बढत्या देताना प्रथम बदली अर्ज नुसार बदली देऊन उर्वरची रिक्त जागांवर बदल्या द्याव्यात, अशा अनेक मागणीच्या संदर्भात संपूर्ण राज्यभर ही आंदोलने करण्यात आली. देवगड बस स्थानकाच्या बाहेर आंदोलनात देवगड आगाराचे अध्यक्ष अनिकेत इंदप, सचिव कल्पेश कांबळे, उपाध्यक्ष बबन जाधव, दीपक परब, खजिनदार दिनकर प्रभू मिराशी यांच्या समवेत ज्येष्ठ सल्लागार मंगेश बापडेकर, तुकाराम देवरुखकर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
या न्याय मागण्यांची पूर्तता न झाल्यास या पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलकांच्या वतीने देण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.