महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे मुलुंडमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन

प्रातिनिधिक फोटो

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना भेडसावणाऱया विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा व ठराव करून सरकारला त्याची दखल घ्यायला भाग पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे एका दिवसाचे राज्यस्तरीय अधिवेशन 10 फेब्रुवारीला मुलुंड पूर्व येथील आर. आर. एज्युकेशन ट्रस्टच्या मैदानात आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, खासदार संजय पाटील, शिवसेना नेते आमदार अनिल परब उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना भेडसावणाऱया समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद, नगर परिषद, पालिका आणि विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, रात्रशाळा, आश्रमशाळा, हंगामी तत्त्वावर आणि तासिका तत्त्वावर नियुक्त शिक्षक व जुनी पेन्शन योजना यासह विविध विषयांवर दोन सत्रांमध्ये चर्चा करून ठराव करण्यात येतील आणि ते निराकरणासाठी सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, अधिवेशनात मोठय़ा प्रमाणात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था चालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.