बेरोजगार, वृद्ध, अपंग अशा लाखो विक्रेत्यांना रोजगार देण्याचे काम महाराष्ट्र राज्य लॉटरी करते, मात्र आता हीच लॉटरी बंदी करण्याच्या हालचाली सरकार करत आहे. लॉटरी बंदीचा निर्णय घेतल्यास लाखो विक्रेते रस्त्यावर उतरून याचा विरोध करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी सरकारला दिला आहे.
राज्य सरकारकडून लॉटरी बंदीसंदर्भात सुरू असलेल्या हालचालीसंदर्भात सातार्डेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारून विक्रेत्यांची रोजीरोटी सुरक्षित ठेवावी, अशीही विनंती त्यांनी केली. यावेळी सरचिटणीस राजेश बोरकर, उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा, भावेश पवार, अनिल सावंत, उषा पंटागले, दीपाली शर्मा, आशीष गुरव आदी उपस्थित होते.