जागतिक बिलियर्ड्स विजेता ध्रुव सितवालावर 4-2 असा विजय मिळवत रायन राझमीने मलबार हिल क्लब महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धेत सीनियर पुरुष बिलियर्ड्स स्पर्धा जिंकली. सीनियर स्नूकरमध्ये बाजी मारलेल्या रायनचे हे दुसरे विजेतेपद आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत सोमवारी उंचपुऱ्या राझमीला सुरुवातीला सितवालाकडून थोडा प्रतिकार झाला, मात्र त्याने सातत्य राखताना 150(66)-73(55), 61-151(81), 151(97)-147(139), 73-151(74, 58), 152-134, 152(56,53)-67 अशी बाजी मारली. रायनने सीनियर बिलियर्ड्सपूर्वी सीनियर स्नूकर प्रकाराचे जेतेपद मिळवले होते. त्याने या स्पर्धेत दोन्ही स्पर्धा जिंकण्याची करामत साधली. विजेत्या रायन राझमीने जेतेपदाच्या चषकासह रोख 40 हजार रुपयांची कमाई केली. उपविजेत्या सितवालाला चषकासह रोख 20 हजार रुपये मिळाले.