National Games 2025 : महाराष्ट्राचा डंका!

उत्तराखंडमधील बोचरी थंडी आणि बारा शहरात विखुरलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे वार्तांकन करताना एक क्रीडा पत्रकार म्हणून चांगलाच कस लागणार या मानसिकतेच मी देवभूमीत दाखल झालो होतो. खो-खो, योगासन, सायकलिंग आणि जलतरण या महत्त्वाच्या स्पर्धा हल्दवानी येथे असल्याने डेहराडूनहून तिकडे कूच केली. हल्दवानीमधील गौलापार स्टेडियममध्ये पाऊल ठेवताच महाराष्ट्रातील खेळाडूंचे थवे दिसायला लागले. एवढेच नव्हे, तर स्पर्धेत स्वयंसेवक, काही पंच, तांत्रिक अधिकारी आणि व्यवस्थापन समितीतील लोकंही महाराष्ट्रातील होते. त्यामुळे उत्तराखंडमध्ये असूनही आम्हाला महाराष्ट्रात असल्याचा भास होत होता. रुद्रपूरमध्ये देशातील सर्वोत्तम सायकलिंग वेलोड्रम बनवलाय हे समजल्यावर एक दिवस तिकडे गेलो. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव हे पुण्यातील असल्याने आणि ते वेन्यू इन्चार्ज असल्याने मला सर्वत्र मुक्त संचार होता. गंमत म्हणजे कूकच्या ड्रेसमध्ये असलेले दोघे जण प्रताप जाधव यांच्याकडे आले अन् त्यातील एकजण म्हणाला, ‘मी दुसरीकडे चाललोय, तुमच्यासाठी आता ही व्यक्ती असेल.’ एक कूक उत्तराखंडमध्ये चक्क मराठीत बोलतोय म्हटल्यावर मी अचंबित झालो. मग प्रताप जाधव म्हणाले, या स्पर्धेसाठी जेवणाचे टेंडर मुंबईच्या थॉमस कूक यांना देण्यात आले आहे. मग त्या कूकने सांगितले की, आम्ही महाराष्ट्रातून दोनशेहून अधिक महिला आणि पुरुष कॅटरर्स म्हणून उत्तराखंडमध्ये या स्पर्धेसाठी आलो आहोत. मग मी जिकडे जाईल तिकडे मराठी लोकांना भेटायला लागलो. बरेचं लोकं मोबाईलवर मराठी बोलताना दिसले की त्यांची विचारपूस करायचो. यातील बहुतांश मुले-मुली ही पुणे व मुंबईतील असायची. एकदा उत्तराखंडच्या नेटबॉल संघासोबत चाललो होतो. त्यांच्याशी बोलताना कळले की, त्या महिला संघाची कोच आपल्या सातारची शरयू जगताप ही मराठी मुलगी होती. शरयू आली अन् आम्ही मराठी बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, महाराष्ट्राचा नेटबॉल संघ राष्ट्रीय स्पर्धेस पात्र ठरला नाही. त्यामुळे उत्तराखंडने मला त्यांच्या संघासाठी प्रशिक्षक म्हणून घेतले. सांगायचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान विविध भूमिकेतील अनेक मराठी माणसे देवभूमीत रोज भेटत होती, त्यांच्याशी ओळखी होत होत्या. त्यामुळे पुण्यापासून दीड हजार किलोमीटर दूर असूनही आम्हाला महाराष्ट्रातच असल्याचा भास होत होता एवढं नक्की. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (आयआयएसएम), नॅशनल ऍकॅडमी ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (एनएएसएम), सिंबायोसिस स्पोर्ट्स मॅनेजमेंट अशा पुणे-मुंबईतील कंपन्यामधील शेकडो मुले-मुली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने उत्तराखंडमध्ये झटताना बघून खरचं महाराष्ट्राचा अभिमान वाटला. प्रत्यक्ष स्पर्धेतही महाराष्ट्रीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केल्याने प्रत्येक स्टेडियममध्ये ‘टीम महाराष्ट्र, जय महाराष्ट्र’चा डंका घुमत असल्याचे बघून एक मराठी क्रीडा पत्रकार या नात्याने माझीसाठीही तो अभिमानाचा क्षण असायचा.