विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवत मिंधे सरकारने जाहीर केलेल्या योजनांसाठी निधी कमी पडू लागला आहे. सरकारी तिजोरी सर्वसामान्यांच्या खिशातून भरण्यासाठी राज्य सरकारने 100 आणि 200 रुपयांचे स्टँपपेपर बंद केल्याने सोमवारपासून अगदी लहान कामांसाठीही थेट 500 रुपयांचे स्टँपपेपर विकत घ्यावे लागत आहेत.
राज्य सरकारने 100 आणि 200 रुपयांचे स्टँपपेपर बंद करून त्याऐवजी 500 रुपयांचे स्टँपपेपर विकण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. या निर्णयाची आता अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे.
एका हाताने दिले दुसऱ्या हाताने लुटले
राज्याती महायुती सरकार एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने लुटण्याचा कारभार हे सरकार सध्या करीत आहे. मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. योजनेच्या जाहिरातींवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. इतर योजनांना कात्री लावूनही जाहिरातींसाठी सरकारला पैसे अपुरे पडत आहेत. म्हणूनच मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय सरकारने घेतला आहे. महागाई वीज दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ आणि त्यात आता मुद्रांक शुल्कासाठी 500 रुपये द्यावे लागणार आहेत अशी टीका आता या सरकारवर होऊ लागली आहे.