मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. उल्हास नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहे. बदलापूर आणि वांगणी दरम्यान रस्त्यावर उल्हास नदीचे पाणी आल्याने कल्याण-कर्जत मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे कर्जत आणि बदलापूरचा संपर्क तुटला आहे. याच परिसरातून रेल्वे मार्ग जात असल्याने खबरदारी म्हणून मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे दरम्यानच्या काही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
बदलापूर- वांगणी दरम्यान रेल्वे ट्रॅकपासून काही अंतरावरच उल्हास नदी वाहते. याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकली होती. हा एक डेड स्पॉट समजला जातो. ज्यामुळे मेल, एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या अडकू शकतात. या परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. आणि उल्हस नदीच्या पुराचा धोका लक्षात घेता मुंबई-पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेससह या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आणि पुण्याहून मुंबईला येणारी इंटरसिटी एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे उद्या सकाळी पुण्याहून मुंबईला येणार डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. आणि मुंबईहून पुण्याला जाणारी इंटरसिटी एक्स्प्रेसही रद्द केली आहे.
बदलापूरमध्ये NDRF चे पथक
बदलापूर शहराला उल्हास नदीच्या पुराचा धोका वाढला आहे. यामुळे बदलापूरमध्ये NDRF चे पथक दाखल झाले आहे. उल्हास नदीला पूर आल्याने एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.