विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती, पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही. गडचिरोलीत विपुल खनिज संपत्ती आहे, ती लाडका उद्योगपती लुटत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
धारावी प्रकल्प अदानीलाच देण्याचा निर्णय सरकारने केला आहे. अधिवेशनातून सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. भाजपा युती सरकार हे गरीब, तरुण, शेतकऱ्यांचे नाही तर मूठभर श्रीमंताचे आहे, असे नाना पटोले पुढे म्हणाले.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमवारी परभणीला भेट देणार आहेत. पोलीस लाठीमारात मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला ते भेट देणार आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.