महायुतीतील संघर्ष सुरूच; रत्नागिरी-संगमेश्वरमध्ये भाजपच्या माजी आमदाराची आक्रमक भूमिका

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता भाजपने त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक इच्छुकांचा समावेश नसल्याने भाजपमध्ये पुन्हा नाराजीनाट्य आणि बंडखोरीची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. महायुतीत अद्यापही काही जागांवर अद्याप रस्सीखेच सुरू आहे. तसेच रत्नागिरी संगमेश्वरच्या जागेवरून महायुतीतील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महायुतीतील प्रत्येक गटाच्या आग्रही भूमिकेमुळे संघर्षात वाढ होत आहे. कोकणातील रत्नागिरी-संगमेश्वर या जागेसाठी महायुतीत संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. भाजपाचे माजी आमदार बाळ माने या जेगावरून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष किंवा इतर पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या जागेवरून महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीत रत्नागिरी-संगमेश्वर या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. या जागेसाठी शिंदे गटाकडून उदय सामंत इच्छुक आहेत. त्यामुळे बाळ माने अस्वस्थ झाले आहेत. उमेदवारी मिळाली नाही तर आपण काय भूमिका घ्यायची, असा सवाल माने यांनी आपल्या समर्थक, मतदारांना केला आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर माने पुढील निर्णय घेणार आहेत. त्यामुळे महायुतीत या जागेवरून संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.