महायुतीने अदानीच्या घशात घातलेली जमीन काढणार, मुंबईकरांसाठी मुंबईतच घरे बांधणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे चार उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सभा घेतली. या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या सभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली. आपले सरकार आल्यावर अदानीच्या घशात घातलेली जमीन परत मिळवणारच असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

आज मुंबई कोणाच्या घशात घालण्यात येत आहे. मुंबई ही आम्हाला आंदण मिळाली नव्हती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने आपण हक्काने मिळवली होती, रक्त सांडून, बलिदान देत, आंदोलन करून ती संघर्षाने आपण मिळवली होती. आपण संघर्ष करून मिळवलेली मुंबई हे अदानीच्या घशात घालत असतील तर यांचे राज्य परत आल्यावर तुमच्या सातबारावर ते अदानीचे नाव लावू शकतात. त्यामुळे ही कीड जागच्याजागी ठेचण्याची गरज आहे. आपले सरकार आल्यावर अदानीच्या घशात घातलेली जमीन बाहेर काढणार, अदानीला दिलेल्या सोयीसुविधा, सवलती रद्द करणार. तसेच मुंबई आपल्या हक्काची आहे. अदानीचा हक्क नाही. त्याला दिलेली जमीन काढणार आणि मुंबईतील नागरिकांना मुंबईतच परवडणारे घर देणार आहे, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.

तुमच्या नजरेत मी भावी मुख्यमंत्री असने. मात्र, माझी ही लढाई मुख्यमंत्रीपदासाठी नाही. महाराष्ट्रासाठी, तुमच्यासाठी मी लढत आहे. माझा महाराष्ट्र मी तुटू देणार नाही. माझा महाराष्ट्र मी विकू देणार नाही. महाराष्ट्र झुकू देणार नाही. महाराष्ट्र लुटू देणार नाही. याचसाठी तुमच्या साथीने आपली लढाई आहे. त्यांच्याकडे सत्ता, यंत्रणा आहे. असे असूनही ते उद्धव ठाकरेंना संपवू शकत नाही, हे त्यांचे दुर्दैव आहे. आपण एकटे नाही. त्यांनी 40 जण फोडले असतील, त्याबदल्यात 40 लाख जनता माझ्याकडे आहे. हे सुरक्षाकवच हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला हे दिले आहे. ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. पण त्यांच्या नशिबी वडिलोपार्जित संपत्ती नाही. ही कोणाचिही ढापलेली, चोरलेली संपत्ती नाही. ही शिवसेनाप्रमुखांनी आपल्या विचारांवर, मेहनतीने कमावलेली संपत्ती आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या समाजसेवेतून, समाज कार्यातून कमावलेली संपत्ती आहे. म्हणून मोदी यांनी कितीही प्रयत्न केले, तरी तुम्ही यांना माझ्यापासून तोडू शकत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.