लोभासाठी स्वतःला विकणारे उद्या आपले भविष्यही विकतील; आदित्य ठाकरे यांचा मिंध्यावर घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला विचार करुन मत द्यावे, असे आवाहन केले आहे. तसेच या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही तोफ डागली आहे. ज्यांनी लोभापायी स्वतःला विकले ते उद्या आपले भविष्यही विकतील असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

प्रदूषण, भ्रष्टाचार, ढिसाळ कारभार, ढासळत चाललेल्या पायाभूत सुविधा, सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा अभाव, महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची भीषण अवस्था यांसारख्या अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत. एम.टी. एच. एल आणि दिघा रेल्वे स्थानकासारख्या पायाभूत सुविधा अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व मूळ समस्या लपवण्यासाठी, आत्ताच्या राजवटीने आपल्याला सततच्या धार्मिक, जातीय दंगली, नागरी अशांतता आणि टीव्ही वादविवादांमध्ये व्यस्त ठेवले आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि इतर समस्यांकडून लक्ष वळावे म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक या कार्यक्रमांमध्ये गुंतवून ठेवले जाते आणि मूळ मुद्द्यांपासून भरकटवले जात आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आता आपण ठरवायला हवे की आपल्याला, आपल्या राज्यासाठी, शहरासाठी आपल्या शेतीसाठी, परिसरासाठी आणि आपल्या स्वतःसाठी काय हवे आहे? मी नेहमीच हे सांगत आलोय, जी माणसे वर्तमान आणि भविष्याचा विकास करण्यासाठी काहीच करु शकत नाहीत, भूतकाळातल्या वादात आपल्याला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. सत्य हे आहे की आपल्याला भूतकाळाबद्दलच्या भांडणावर त्यांचे भविष्य अवलंबून आहे. पण आपले भविष्य, आपण आपल्या उद्यासाठी काय करणार आहोत यावर अवलंबून आहे. ज्यांनी लोभापायी स्वतःला विकले, जे उद्या आपले भविष्यही विकायला मागेपुढे बघणार नाहीत. अशा गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची, तुमची प्रगती होईल असे खरेच तुम्हाला वाटते का, असा सवालही त्यांनी केला आहे.

काही कॅबिनेट मंत्र्यांनी महिला खासदारांना शिवीगाळ केली. काही आमदार फोनवर अधिकाऱ्याला धमकावत असल्याचे कॉलही रेकॉर्ड झाले आहेत. परंतु या सर्व कृत्यांसाठी त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली. मागच्या दोन वर्षात आपल्या राज्यात 2 लाखांनाहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करु शकणारे उद्योग, राजवटीच्या लाडक्या राज्यात पळवले गेले. नैसर्गिकरित्या त्यांनी नक्कीच महाराष्ट्राची निवड केली असती, पण त्यांना जबरदस्तीने दूर नेले गेले. देशभरातून अनेक लोक उदरनिर्वाचाी स्वप्ने घेऊन राज्यात येतात. पण आपल्या राज्याला आणि या लोकांना मात्र या स्वप्नांपासून दूर नेले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्राचा अभिमान, वैभव लुटण्याचा प्रयत्न ही महाराष्ट्रविरोधी राजवट करत आहे. अशा राजवटीत तुमचे उज्वल भविष्य घडेल असे तुम्हाला वाटते का? अशा राजवटीत तुम्ही राहायला तयार आहात का? हे वर्ष केवळ विचार करायचे नाही, तर कृती करण्याचे वर्ष आहे. ही कृती म्हणजे तुमचं ‘मत’. तुमचे मत हे तुमचं भविष्य आहे, आपले भविष्य आहे. हे भारताबद्दल आहे, हे महाराष्ट्राबद्दल आहे आणि हे या महान राष्ट्राच्या नागरिकांबद्दल आहे. तुमचे आजचे मत तुमच्या भविष्यासाठी मौल्यवान आहे. सत्याच्या आणि न्यायाच्या बाजून लढणाऱ्यांना या हुकूमशाहीत त्रास दिला जाईल, अडचणीत आणले जाईल, पण हा लढा जर आपण मिळून लढलो तर अंतिम विजय सत्याचाच आहे.